11मोरपीस

नारायण मुर्ती यांनी
लिहिलेल्या कथेचे भाषांतर…
कथा खूप ह्रुदयस्पर्शी आहे
जरुर वाचा…!
.
माझी पत्नी आतून ओरडली,
“आता किती वेळ तो पेपर
वाचत बसणार आहात…?
आता ठेवा तो पेपर आणि
तुमच्या लाडक्या लेकीला
खायला दिलय ते
संपवायला सांगा…!”
.
मामला गंभीर
वळण घेणार
असे दिसलं..!
मी पेपर बाजुला सारला
आणि घटनास्थळी
दाखल झालो…
.
सिंधू,
माझी एकुलती एक
लाडाची लेक रडवेली
झालेली होती.
डोळे पाण्याने
काठोकाठ भरलेले.
.
तिच्या पुढे एक दहिभाताने
पूर्ण भरलेला बाऊल होता.
सिंधू, तिच्या वयाच्या मानाने
शांत व समजुतदार, गोड
आणि हुशार मुलगी होती.
.
मी बाऊल उचलला
आणि म्हणालो,
“बाळ, तू चार घास खाशील का..?
तुझ्या बाबा साठी…?”
.
सिंधू,
माझी बाळी; थोड़ी नरमली;
पालथ्या मुठीने डोळे पुसले.
आणि म्हणाली,
“चार घासच नाही,
मी सगळ संपविन.”
थोडी घुटमळली
आणि म्हणाली,
“बाबा,
मी हे सगळ संपवल तर…
तुम्ही मला मी मागीन
ते द्याल..?”
.
” नक्की…!”
तीने पुढे केलेल्या
गुलाबी हातात मी हात दिला
आणि वचन पक्के केले.
.
पण आता मी थोडा गंभीर झालो.
“बाळ, पण तू कंप्यूटर किंवा
दुसर एखाद महागड खेळण
मागशील तर आता बाबाकडे
तेवढे पैसे नाहीयेत बेटा…!”
.
“नाही बाबा..! मला तस
काही नको आहे…!”
तिने मोठ्या मुश्किलीने
तो दहीभात संपवला…
.
मला माझ्या पत्नीचा आणि
आईचा खूप राग आला.
एवढ्या छोट्या मुलीला
कुणी एवढ खायला देतात…?
ते पण तिला न आवडणार.
.
पण मी गप्प बसलो.
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन
संपविल्यावर हात धुऊन
सिंधू माझ्यापाशी आली…
.
डोळे अपेक्षेने मोठे करून.
आमच्या सगळ्यांच्या
नजरा तिच्याकडे होत्या.
“बाबा, मी या रविवारी सगळे
केस काढून टाकणार…!”
तिची ही मागणी होती…
.
“हा काय मुर्खपणा चाललाय…?
काय वेड बीड लागलय काय…?
मुलीचे मुंडण…? अशक्य…!”
.
सौ चा आवाज वाढत
चालला होता…!
“आपल्या सगळ्या
खानदानात आसल काही
कुणी केल नाही…!”
आईने खडसावले.
“ती सारखी टिव्ही पहात असते…!
त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती
आणि संस्कार वाया चालले आहेत…!”
.
“बेटा, तू दुसर काही
का मागत नाहीस…?
या तुझ्या कृत्यामुळे
आम्ही सगळे दु:खी होऊ…!
तुला आम्हाला बघवेल का सांग…?”
.
“सिंधू, बेटा आमचाही विचार कर…!”
मी विनवणीच्या स्वरात म्हटले…
.
“बाबा, तुम्ही पाहिलत ना
मला तो दहीभात संपवन
किती जड जात होत ते…!”
.
आता ती रडायच्या बेतात होती.
“आणि तुम्ही मला त्याबदल्यात
मी मागीन ते द्यायचं
कबूल केल होतं…!
आता तुम्ही मागे हटता आहात.
मला कोणत्याही परिस्थितीत
दिलेल वचन पाळणा-या
राजा हरिश्चंद्राची गोष्ट
तुम्हीच सांगितली होती ना…?
.
आपण दिलेली वचने
आपण पाळलीच पाहिजेत…!”
मला आता ठाम पणा
दाखवणे भाग होते…
.
“काय डोके-बिके फिरलेय काय..?”
आई आणि सौ. एकसुरात…
.
आता जर मी दिलेला
शब्द पाळला नाही.
तर सिंधू पण दिलेला
शब्द तिच्या पुढल्या
आयुष्यात पाळणार नाही.
.
मी ठरविले,
तिची मागणी पूरी केली जाईल…
.
गुळगुळीत टक्कल केलेल्या
सिंधूचा चेहरा गोल असल्याने
आता तिचे डोळे खूप मोठे
आणि सुंदर दिसत होते…
.
सोमवारी सकाळी मी तीला
शाळेत सोडायला गेलो.
मुंडण केलेली सिंधू
शाळेत जाताना बघणे
एक विलक्षण दृष्य होत.
ती मागे वळली आणि
टाटा केला मी ही
हसून टाटा केला…
.
तेंव्हाच एक मुलगा
कार मधून उतरला आणि
त्याने तिला हाक मारली,
“सिंधू माझ्यासाठी थांब.”
.
गंमत म्हणजे त्याचे ही
टक्कल केलेले होते.
अच्छा, हे असं आहे तर
मी मनात म्हणालो…
.
त्या कार मधून
एक बाई उतरल्या आणि
माझ्या पाशी आल्या..!
“तुमची सिंधू किती
गोड मुलगी आहे.
तिच्यासोबत जातोय
तो माझा मुलगा,
हरीष नाव त्याचे.
त्याला ल्यूकेमिया
(Blood cancer) झालाय.
.
येणारा हुंदका त्यानी
आवंढा गिळून दाबला
आणि पुढे म्हणाल्या,
.
“गेला पूर्ण महीना
तो शाळेत आला नाही.
केमोथेरपि चालु होती.
त्यामुळे त्याचे सगळे
केस गळाले.
तो नंतर शाळेत यायला
तयारच नव्हता.
कारण मुद्दाम नाही तरी
सहाजिकच मुले चिडवणार…
.
सिंधू मागच्याच आठवड्यात
त्याला भेटायला आली होती.
तिने त्याला तयार केले की
चिडवणा-यांचे मी पाहून घेइन
पण तू शाळा नकोस बुडवू…
.
मी कल्पनाही केली नव्हती
की ती माझ्या मुलासाठी
आपले इतके सुंदर केस
गमवायला तयार होईल…
.
तुम्ही तिचे आईवडील
किती भाग्यवान आहात.
अशी निस्वार्थी आणि निरागस
मुलगी तुम्हाला लाभली आहे…”
.
ऐकून मी स्तब्ध झालो.
माझ्या डोळ्यातून
अश्रू ओघळले.
मी मनाशी म्हणत होतो…
माझी छोटीशी परी
मलाच शिकवते आहे.
खर निस्वार्थ प्रेम
म्हणजे काय ते…
.
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत
जे स्वत:ची मनमानी करतात
सुखी तेच की जे दुस-यावर
जिवापाड प्रेम करतात आणि
त्यांच्यासाठी स्वत:ला
बदलायलाही तयार होतात…

.
आपल्यालाही आपलं आयुष्य
सिंधू सारख बदलता यायला पाहिजे…

Advertisements

10मोरपीस

माहेर…..

ए आई थांब ना गं….
अजून थोडेसे झोपते गं…. मुलांसोबत लोळण्याचं सुख काही औरच.. हा फरक आहे माहेर आणि सासर ह्यात…

आज परत निघायचं खूप आठवणी शिदोरीत बांधून…
नवीन उमेद.. नवा उत्साह सोबत घेऊन… इथे आले कि किंमत कळते… माहेर किती महत्वाचे आहे…

सासरी जाच नसतो… सासूबाई पण प्रेमळच आहेत… सासरे अगदी वडिलांचे सारखी माया करतात…. नवरा तर हक्काचा कायमच साथ देतो पण….

पण असतोच आई वडील काही वेगळे असतात नाही का…

भाऊ…. अगदी वडिलांच्या जागी दिसतो… खूप कामात असतो…. बोलायला पण वेळ नसतो पण मला माहिती आहे कि मनाच्या कोपऱ्यात मला जागा दिली आहे… एक शब्द तो मायेने बोलला तरी भरून येते…

आणि माझी चिमुकली भाची… आत्या आत्या अशी हाक कानावर आली ना कि काय भारी वाटत… आपल्या लेकरासारखीच वाटणारी… तिचं हसू, तिचा खोडकर पणा, तिची प्रेमाची मिठी मी सगळ्यांत जास्त मिस करते. माझ्या मुलांमध्ये आणि तिच्यात असच प्रेम कायम राहावे आणि एकमेकांना कायम धरून राहावेत बस और क्या चाहिये…

किती छान असते ना आईकडे स्वयंपाक काय करायचा… भाजी आणायची का… बाकी काही कामे करायची का… ह्याचा विचार पण करावा लागतं नाही… आई सगळे करत असते अगदी न दमता हसत मुखाने.. हीच आई असते..

आज निघणार पण मनांत द्विधा परिस्थिती असते..
आई वडिलांना सोडून का जायचं असते
पण हे आपले घरी नाही हे हि माहिती असते…
आपल घरी शेवटी सासरचं…

. मुलं वडिलांची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मी मात्र माझ्या वडिलांना सोडून जायचं म्हणून मनातूनच रडत असते… किती अवघड आहे ना…

माझी मुलगी तिच्या वडिलांना भेटणार म्हणून नाचत असते आणि मी… माझ्या वडिलांची मुलगी… परत जायचं म्हणून हिरमुसून जाते..

पण आईचे संस्कार इतके पक्के आहेत कि माहेर आणि सासर ह्यात अंतर ठेवायलाच हवे ह्याची जाण असते… आईने शिकवले आहे उगाच आई आई करायचं नाही, आपल्याला जेव्हढं मिळाले आहे त्यात कायम समाधानी राहावे.
(आईला मी असच पहिले आहे कायम समाधानी )..

सासूसासरे हे आईवडिलच आहेत त्यांचा मान ठेवलाच गेला पाहिजे तरच मुलांवर संस्कार होतील . आज आईने सांगितलेलं किती मोलाचे आहे ते कळते….

आता पुढल्या वर्षी मी अशीच भरपूर दिवस येणार त्याचं planning पण सुरु झाले माझं आणि मुलांचं…

निघताना रडू तर येतेच मग मुलगी म्हणते आई मी आहे ना!!!

ती एक ओळ आहे ना ..

#लेकीच्या #माहेरासाठी #आई #सासरी #नांदते…

हेच सत्य आहे…. मला त्यात समाधान आहे…

समर्थ काळजी घ्या माझ्या माहेरची अशीच भरभराट होऊ दे आणि ह्या लेकीला काही नको….

एक लेक…

!! स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी
!!

# मोरपीस ८

थंडीमुळे आज चाफा ही गारठला होता ….
सुगंध पसरायला जरा त्याला वेळच झाला होता

काटे असूनही गुलाब थंडीत सुंदर दिसत होता .. केसात माळला जाईन की देवाच्या चरणी जाईन याचाच विचार करत होता

आबोली मात्र शांत बसली होती थंडीची मखमली चादर तीने लपेटली होती

मोगरयाला उठण्यास जरा उशीरच झाला पण सुहास मात्र त्याने मध्यरात्रीच दरवळला होता चहुकडे

रात्रभर जागरण करून रातराणी नुकतीच उठली होती .. पानावरच्या दवबिंदुशी काही तरी गुजगोष्टी करत होती

गंधाळलेल्या नजरेनी निशीगंध सारे पहात होता थंडीतल्या कोवळ्या किरणाना तो हसत अंगावर घेत होता

गुलाबी थंडीतही ही फुलांची अशी मजा चालली होती … संकटातही मजेत रहा असे प्रत्येक पाकळी जणू सांगत होती.

# मोरपीस ७

🌿🌷🍃

*मन आवरायला हवे*

चला, आज मन आवरायला हवे
केव्हापासून ठरवतोय
कानाकोपऱ्यात साचलेल्या…
या जळमटांना काढायला हवे!

उगीच जपून ठेवलेल्या
जुन्या घटना, प्रसंग
नकोसे…
तरीही जपलेले क्षण
तातडीने फेकून द्यायला हवेत.
वेळचेवेळी मन आवरायला हवे.

माळावरचा अहंकार.. क्रोध
मधेच डोके वर काढतात लेकाचे
जुन्या पोत्यात बांधून……
आजच फेकून द्यायला हवे.
मन आवरायलाच हवे.

मनाच्या दर्शनी कप्प्यात
पाय पसरून निवांत पडलेत
मोह आणि माया..
सारं आयुष्य बरबाद करतायत.
त्वरेने नष्टच करायला हवेत..
मनाचे कोपरे आवरायला हवेत.

ह्या द्वेषाच्या जळमटांनी
मनाचे सारे कोपरे भरून गेलेत.
कितीवेळा झाडलेत तरी
हजर आहेत.. पुन्हा पुन्हा..
रोजच तिथे झाडू फिरायला हवेत.
मनाचे कोपरे घासायला हवेत.

पुसायला हवीत तावदाने
क्षमेच्या फडक्याने…
झटकायची संशयांची धूळ
दयेच्या झटकणीने…
काचेपल्याडचे निर्मळ झरे…
रोज दिसायला हवेत
आपले मन आवरायला हवे!

उघडायला हव्यात
मनाच्या घट्ट खिडक्या
खेळू देत मोकळे वारे…
विसरायचं सारे जुनेपाने
समज… गैरसमज…
झाले गेले… विसरायला हवे
आता मन आवरायला हवे.

मस्त वाटतंय आता
हलकं हलकं…
म्हातारीच्या तरंगत्या
पिसासारखं..
अलगद टेकलोय आता..
वास्तवाच्या जवळ
‘जमिनी’वर..!
येथेच आता रमायला हवे.
वरचेवर मन आवरायला हवे! 🌹🌹

#मोरपीस ६

सहजीवन म्हणजे..

सहजीवन म्हणजे
एक अकेली छत्रीमध्ये
अर्ध अर्ध भिजणं
एक चिंचेचं बुटुक
दोघांनी मिळून खाणं.

मेहेन्दी हसनची गज़ल ऐकत
कातर होत जाणं
पावसाळी गच्च आभाळात
मग सायकली दामटणं.

सहजीवन म्हणजे
प्रेमात ‘सांगू की नको वाटणं
बंद मुठीत काय असेल
याने दिल धडकणं.

स्वप्न बघणं, साद घालणं,
हवं नको सांगणं
अटीतटीला येऊन कधी
तुटेल की कायसं वाटणं.

सहजीवन म्हणजे उतायचं नाही,
सहजीवन म्हणजे मातायचं नाही
घेतला वसा टाकून कधी
तुटेपर्यन्त ताणायचं नाही.

सहजीवन म्हणजे अवघड वाट,
सहजीवन म्हणजे दुस्तर घाट
कधी अगदीच मयसभा आणि
कधि चाकोरीची वहीवाट.

सहजीवन म्हणजे अनेक होकार,
सहजीवन म्हणजे किती तरी नकार
सहजीवन म्हणजे
एकमेकांच्या भावनांचा सन्मान
सहजीवन म्हणजे
एकमेकांच्या माणसांचा स्वीकार.

सहजीवन म्हणजे
एकमेकांचं मन समजून घेणं
सहजीवन म्हणजे
एकमेकांच्या दु:खावर फुंकर घालणं.

सहजीवनात नाही एकाचीच भरारी
सहजीवनात नाही एकाचीच मक्तेदारी.

सहजीवनात नसतं कुणी
एकच पायाचा दगड
सहजीवनात नसतं कुणी
एकच चुलीच्या जवळ.

सहजीवन म्हणजे अर्थातच
दळणाची पिशवी, रॉकेलचा डबाही
सहजीवन म्हणजे नक्कीच
पाळणाघर नी बस लोकलचा रेटाही.

सहजीवन म्हणजे
त्यानेही बाळाची शी-शू काढणं
सहजीवन म्हणजे
बाळासाठी दोघांनीही जागणं.

सहजीवन म्हणजे
दोघांनी मिळून आपलं घरटं बांधणं
सहजीवन म्हणजे
त्या झोपडीला मज्जेत महाल म्हणणं.

सहजीवन असतं परस्परांना फुलवणं
एकच गाणं दोघांच्या गळ्यात उमलणं.

सहजीवन म्हणजे
परस्परांच्या मर्यादा समजून घेणं
सहजीवनात एकमेकांना
मोठं करत जाणं.

सहजीवनात नसतं बंदिस्त,
दोघांचंच, दोघांपुरतच
कुटुंब, गणगोत, आप्त,
मित्र सामावून घेणं.

पंख फुटून भरारणार्या पिल्लांना
आनंदाने निरोप देणं
चुकली माकली थकली तर
उबदार सेज तयार ठेवणं.

दुखरी पाठ बरोब्बर दाबणं,
दुखलेलं मन सहज ओळखणं
स्वप्न तुटतांना, विरतांनाही
दोघांनी मिळून सोसणं.

सहजीवन म्हणजे
एकमेकांचे पिकणारे केस दाखवणं
पोटाच्या वाढत्या घेरावरून
कान धरून व्यायामाला लावणं.

सहजीवन म्हणजे परस्परांसाठी
हमेशा खुला चौथा कमरा
‘जा त्या घरी’ न म्हणणारा
विश्वासाचा कोपरा.

सहजीवन म्हणजे चुकल्या-माकल्याचा
सहज दिला जाणारा हिशोब
सहजीवनात ‘सॉरी’ म्हणायला
कशासाठी असावा संकोच?

सहजीवन म्हणजे पिकतांना मिळून
आठवायची सारी कथा
‘माझ्याआधी तू जायचं नाही’
एकमेकांना घालायच्या शपथा!
🌺 दांपत्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🌺

#मोरपीस ५

देवीशी हितगुज 🌸🌸🌸
सकाळी पूजा झाल्यावर देवीशी झाले माझे हितगुज
वस्त्र , अलंकारांनी सजलेली देवी म्हणे झाले मी खुश बोल काय हवे तुला
मी म्हंटलं प्रेमळ आईवडील , सासुसासरे दिलेच तू मला
निरोगी , शांत आयुष्य दे त्यांना
बस आणखी काय पाहिजे मला

कर्तबगार , कष्टाळू , काळजी घेणारा नवरा दिलाय तू मला
स्थिर नोकरी , बढती , यशकीर्ती लाभू दे त्याला
उदंड आयुष्य दे त्याला अन अखंड सौभाग्याचे वाण दे मला
बस आणखी काय पाहिजे मला

गोड , सुंदर , हुशार मुली दिल्याच आहेत तू मला
बुद्धीचा विकास होऊ दे त्यांचा , उत्कर्ष होऊ दे जीवनात , माझ्यासारखच चांगलं घर मिळू देत त्यांना
बस आणखी काय पाहिजे मला

छान , नीटनेटकं हक्काचं घर दिलंस तू मला
सुख , शांती , समाधान , ऐश्वर्य नांदू दे त्या घरात
बस आणखी काय पाहिजे मला
लक्षमी , सरस्वती प्रसन्न आहेच मला
येणारी लक्षमी चांगल्या मार्गाने येऊ दे अन केलेल्या कष्टाचे चांगले फळ दे
बस आणखी काय पाहिजे मला
लक्ष्मी माता म्हणाली तथास्तु …
अन पुढे म्हणे अग स्वतः साठी काहीतरी माग ……
: मग क्षणाचीही उसंत न घेता मी म्हंटलं , जे जे मला देशील ते सर्व माझ्या प्रिय मैत्रिनिंच्याही पदरात घाल
सगळ्या आहेत खूप गोड , कुटुंबवत्सल , जीवाला जीव देणाऱ्या
यावरही देवी म्हणाली तथास्तु .
…….🌸🌸🌸

#मोरपीस ४

*”झुकल्या पापण्या”*

नव्या घराचा पाया भरतांना,
तो दिसला मला माझ्याकडे येतांना..!

येताच म्हणाला,
“मी वास्तुशास्त्र जाणतो..!”
“कुठे बेड, कुठे हाॅल,
कुठे किचन असावं सांगतो..!”

“शास्त्र माझे सर्व काही सांगते,
मी सांगेन तिथेच सुख नांदते..!”

ऐकून त्याचा सारा कित्ता
मी म्हणालो,

“दोस्ता थोडं थांब
अन्…
मला तिथल्या सुखाचं गुपीत सांग..!”
“जिथं दहा बाय दहाच्या खोलीत
मोठा समूह रहातो..!”

“जिथं या कुशीवर वळलं की
बेड होतो..!”
“त्या कुशीवर वळलं की
हाॅल होतो..!”
“पोटात आग पडली की
तेच होतं किचन..!”

“कुठल्याच सुखसोई
नसल्या तरीही
मजेत फुलतो देह,
ना कुणा रक्तदाब
ना कुणा मधुमेह..!”

“काही सूचत नसेल
तर तसं सांग..!”
“न बोलताच
का चाललास लांब..?”

“दोस्ता…
कदाचित इलाजाला पैसा नसेल,
‘विरंगुळ्याचे रोग’ लागत नसतील..!”

“त्यांचं दुःखच देतं त्यांना
जगण्याचं बळ..!”
“त्याचं दुःखच घालतं त्यांना
जगण्याची गळ..!!”

“नीट उत्तर दे..!”

प्रश्न आणखी विचारतो सोपा,

“कुठल्या शास्त्राला विचारून
सुगरण विणते रे खोपा..?”

“दोस्ता…
सुख नांदण्यासाठी
“या खोलीचं तोंड
त्या दिशेला नसावं..?”
अन्
“त्या खोलीचं तोंड
या दिशेला नसावं..?”

या तकलादू शास्त्रापेक्षा रे,

“माणसाचं *तोंड*
माणसाकडं असावं..!”
अन्
“माणसाचं *मन*
माणसाला दिसावं रे..!!!”